पाटना : बिहारच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. जनता दल युनायटडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबतची युती तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. रविवारी नितीश यांनी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अशातच आरजेडीचे सर्वेसर्वा लालू यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणी लालू यादव यांना आज ईडी कार्यालयासमोर हजर करण्यात आले. यावरून त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले.
रोहिणी यांनी नाव न घेता भाजपसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इशारा दिला आहे. रोहिणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज जर वडिलांना काही झाले तर त्याला सीबीआय, ईडी आणि त्यांचे मालक जबाबदार असतील. बिहार सरकारमधून लालूंची आरजेडी रातोरात बाहेर फेकली गेली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार लालू यादव यांना आज ईडीसमोर हजर केले जात आहे. यावरून लालूंची लेक चांगलीच संतापली आहे. एकापाठोपाठ पाच पोस्ट टाकून त्यांनी भाजपला तसेच नितीश कुमारांना इशारा दिला.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले की, आज माझ्या वडिलांना काही झाले तर त्याला नितीश कुमार यांच्यासह सीबीआय आणि ईडी तसेच त्यांचे मालक जबाबदार असतील. आणखी एका पोस्टमध्ये रोहिणी यांनी म्हटले, माझे वडील आताच्या घडीला कोणत्या स्थितीत आहेत याची सर्वांना कल्पना आहे. इतरांच्या मदतीशिवाय त्यांना चालता येत नाही, तरीही लोक किती खालची पातळी गाठणार आहेत. माझ्या वडिलांना खरचटले तरी माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल हे त्यांनी लक्षात ठेवावे.