कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम आता दिसून येत आहे. संदेशखळी येथील प्रकरण राजकीय वर्तुळात तापल्यानंतर आता प्रशासन जागे झाले असून गरिबांना न्याय मिळू लागला आहे. आता संदेशखळी येथील बळजबरीने बळकावलेल्या जमिनीवर कारवाई करून त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्यात येत आहे.
संदेशखळी येथील आतापर्यंत ६१ जणांना जमिनी परत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळीमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख आणि इतरांविरोधात गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांनी गरीबांच्या जमिनी बळकावल्या आणि येथील महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. यानंतर संदेशखळी प्रकरणी राजकीय वातावरण तापले. तसेच, याप्रकरणी स्थानिक निदर्शने करत आहेत. शासकीय छावणीतील जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार आल्यानंतर प्रशासन तपासात गुंतले आहे. या तपासानंतर ६१ जणांना जमिनीचे मालकी हक्क परत मिळाले आहेत. २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान या जमिनी परत करण्यात आल्या. तत्पूर्वी, पश्चिम बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे नेते अजित मैतीला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथून गावक-यांची जमीन बळकावल्याच्या आरोपावरून अटक केली.
अजित मैती हा फरार असलेल्या शाहजहान शेखचा जवळचा सहकारी मानला जातो. त्याला रविवारी संध्याकाळी एका व्यक्तीच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले, जिथे गावक-यांनी पाठलाग केल्यानंतर त्याने चार तासांहून अधिक काळ स्वत:ला कोंडून ठेवले होते, असे एका पोलिस अधिका-याने सांगितले. तसेच, जवळपास ७० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी शाहजहान शेख विरोधात एफआयआर नोंदवला आहे.
महिलांवर अत्याचाराचा आरोप
बहुतेक तक्रारदारांनी आरोप केला आहे की शाहजहान त्यांच्या जमिनीचे जबरदस्तीने संपादन करण्यात आणि स्थानिक महिलांवर अत्याचार करण्यात सक्रियपणे सहभागी होता असे पोलिस अधिका-याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करून महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अजित मैतीची रात्रभर चौकशी करण्यात आली आणि सकाळी त्याला अटक करण्यात आली. संदेशखळी येथील बर्माडजूर भागात शाहजहानच्या प्रभावाखाली अजित मैतीने अनेक भूखंड बळकावल्याचा आरोप आहे.