बीजिंग : वृत्तसंस्था
चीनच्या संशोधकांनी ऑर्डोसच्या खो-यात युरेनियमचा मोठा साठा शोधला आहे. युरेनियमचे भांडार अतिशय मोठे आहे. त्यापासून हजारोंच्या संख्येत अण्वस्त्रे तयार केली जाऊ शकतात. यामुळे प्रदीर्घ कालावधीपर्यंत चीन आपल्या ऊर्जेची गरज भागवू शकतो. युरेनियम मोठ्या प्रमाणात सापडल्याने चीनला त्यापासून स्वच्छ ऊर्जेची निर्मिती करता येईल. चीनच्या हाती लागलेला खजिना अध्यक्ष शी जिनपिंग यांची ताकद वाढवणारा मानला जात आहे.
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार युरेनियमचे भांडार ऑर्डोस खो-यात जिंगचुआनजवळ आहे. एओलियन सँडस्टोन खाण क्षेत्रात सापडलेला युरेनियमचा पहिला मोठा साठा भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. चिनी संशोधकांना सापडलेला साठा तब्बल ३००००००० टन इतका अतिप्रचंड आहे. चीनच्या ऊर्जेसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचा पुरवठा या भांडारातून केला जाईल. असे साठे शोधण्यासाठी चीनचा भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग अनेक विभागांसह खाण कंपन्यांच्या भागिदारीत योजना चालवत असतो.
ऑर्डोस खोरे, यिली, जुंगगर, तारिम, तुहा, कदम, एर्लियन, सोंग्लियाओमध्ये युरेनियमचे साठे सापडतात. याशिवाय देशाच्या अन्य भागांमध्ये युरेनियमचे साठे शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. युरेनियमच्या साठ्यांमधून युरेनियम काढण्यासाठी चीनमध्ये नवनव्या पद्धतींचा वापर केला जात आहे. त्यामुळे चीनला अन्य देशांच्या तुलनेत जास्त युरेनियम सापडते.
ऑर्डोस पठारात शोध
ऑर्डोस पठार चिनी सीमांच्या आतील बाजूस असलेल्या यलो नदी परिसरात आहे. हा भाग होबक आणि मुस वाळवंटाच्या भागापासून जवळ आहे. भूजल भांडार अधिक प्रमाणात असल्याने इथे स्टेपी वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. बोजियांग खो-याचे नामशेष होण्याच्या मार्गावरील अवशेष इकडे पाहायला मिळतात. या भागाचे वाळवंटीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.