लातूर : प्रतिनिधी
इयत्ता १२ वी एच. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल दि. ५ मे रोजी जाहीर झाला. लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८९.४६ टक्के लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूर विभागीय मंडळातून बारावी परीक्षेसाठी ४९२३४ मुली, ४१०४३ मुले असे एकुण ९०२७७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४२३३८ मुली तरी ३८४३२ मुले असे एकुण ८०७७० एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.९९ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.६३ एवढी असून लातूर विभागाची निकालाची टक्केवारी ८९.४६ एवढी आहे.
लातूर विभागीय मंडळ आठव्या क्रमांकावर
महाराष्ट्रात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण, असे नऊ विभागीय मंडळ आहेत. उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात पुणे विभागीय मंडळ क्रमांक एकवर आहेत तर लातूर विभागीय मंडळ आठव्या स्थानी आहे.