28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली

महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली

सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांकडून हा गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दिकी हे त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील कार्यालयाजवळ थांबले होते.

अज्ञात व्यक्तींनी यावेळी सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली, सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. बाबा सिद्दीकीजी यांचे निधन धक्कादायक आणि दु:खदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. अतिशय धक्कादायक! पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. गोळीबार करणा-या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी असे म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे.

सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा : शरद पवार
शरद पवार यांनी या घटनेवर खेद व्यक्त करताना सत्ताधा-यांवर निशाना साधला आहे. शरद पवार यांनी याप्रकरणी सरकारने थेट जबाबदारी स्वीकारावी आणि पायउतार व्हावे, अशा शब्दात सरकारचा समाचार घेतला आहे. राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे. ही बाब चिंतेची आहे. देशाची आर्थिक राजधानीत राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. ही बाब खेदजनक असून गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाढा हाकत असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा आहे. यामुळे आता चौकशी नको सरकारने जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे. आपण बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR