22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयलॉरेन्स बिश्नोईची गँग दाऊदच्या वाटेवर

लॉरेन्स बिश्नोईची गँग दाऊदच्या वाटेवर

७०० शुटर्स, ११ राज्ये, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, एनआयएकडून आरोपपत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सातत्याने कारवाई करीत आहे. दरम्यान, एनआयएने गँगस्टर टेरर प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रारसह अनेक कुख्यात गँगस्टरवर आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात एनआयएने अनेक मोठे खुलासे केले आहेत. बिश्नोई गँगचे देशातील ११ राज्ये आणि ६ देशांत साम्राज्य पसरले असून, गुन्हेगारी वाढली आहे.

लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टेरर सिंडिकेटचा मोठ्या पद्धतीने विस्तार झाला. दाऊद इब्राहिमने ९० च्या दशकात छोटे-मोठे गुन्हे करून आपले नेटवर्क तयार केले होते. त्याच पद्धतीने लॉरेन्स बिश्नोईनेही आपले नेटवर्क तयार केले आहे. दाऊद इब्राहिमने अंमली पदार्थांची तस्करी, टार्गेट किलिंग, खंडणी रॅकेटच्या माध्यमातून आपले साम्राज्य उभे केले. त्यानंतर त्याने डी कंपनी स्थापन केली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून त्याने आपले नेटवर्क वाढविले. दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीप्रमाणेच बिश्नोई गँगनेही किरकोळ गुन्ह्याची सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ची गँग तयार केली. आता बिश्नोई गँगने उत्तर भारताचा ताबा घेतला आहे. सतविंदर सिंग उर्फ गोल्डी ब्रार हा कॅनडाच्या पोलिस आणि भारतीय एजन्सीला हवा आहे, तो बिश्नोई गँग चालवत आहे.

बिश्नोई गँगमध्ये ७०० पेक्षा अधिक शूटर्स आहेत. त्यापैकी ३०० पंजाबशी संबंधित आहेत. बिश्नोई आणि गोल्डी ब्रारचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. बिश्नोई गँगने २०२०-२१ पर्यंत खंडणीतून कोट्यवधी रुपये कमावले आणि तो पैसा हवालाद्वारे परदेशात पाठविला, असे एनआयएने म्हटले आहे.

सोशल मीडिया आणि इतर विविध मार्गांनी तरुणांना गँगमध्ये भरती केले जाते. ही गँग अमेरिका, अझरबैजान, पोर्तुगाल यूएई आणि रशियामध्ये पसरली आहे. तरुणांना कॅनडा किंवा त्याच्या आवडीच्या देशात पाठविण्याचे आमिष दाखवून त्यांना गँगमध्ये भरती केले जाते. एनआयएच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानात राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंग रिंडा हा पंजाबमध्ये टार्गेट किलिंग आणि गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी बिश्नोई गँगच्या शूटर्सचा वापर करतो.

काही दिवसांपूर्वी एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रारसह एकूण १६ गुंडांच्या विरोधात यूएपीए अंतर्गत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या संपूर्ण गँगचा रिपोर्ट थेट साबरमती कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला दिला जातो. या गँगची शस्त्रे मध्य प्रदेशातील माळवा, मेरठ, मुझफ्फरनगर, यूपीमधील अलीगड आणि बिहारमधील मुंगेर, खगरिया येथून येतात. याशिवाय पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाब जिल्ह्यातूनही या गँगकडे शस्त्रे पोहोचतात. याशिवाय या गँगला पाकिस्तान, अमेरिका, रशिया, कॅनडा आणि नेपाळमधूनही शस्त्रे मिळतात, असे एनआयएचे म्हणणे आहे.

पंजाबसोबत अन्य राज्यांतही नेटवर्क
बिश्नोईची गँग एकेकाळी फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. पण त्याने जवळचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यासोबत हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या गँगशी हातमिळवणी करून मोठी गँग तयार केली. बिश्नोई गँग आता उत्तर भारत, पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडमध्ये पसरली आहे, असे एनआयएने म्हटले आहे.

एका-एका भागाची स्वतंत्र जबाबदारी
गोल्डी ब्रार कॅनडा, पंजाब आणि दिल्लीतील गँग हाताळतो. रोहित गोदारा राजस्थान, मध्य प्रदेश आणि अमेरिकेतील गँगवॉर देखरेख करतो तर अनमोल बिश्नोई पोर्तुगाल, यूएसए, दिल्ली एनसीआर, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील गँग नियंत्रण ठेवतो. त्याचवेळी काला जथेडी हरयाणा आणि उत्तराखंडमधील गँग हाताळतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR