30.3 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रबिबट्याने घेतला चिमुकलीचा बळी

बिबट्याने घेतला चिमुकलीचा बळी

आजोबांसोबत शेतात जात होती नात अंगावर शहारे आणणारी घटना

नंदूरबार : मका काढण्यापूर्वी केलेली मानता फेडण्यासाठी शेतात आजोबा आणि काकांसोबत जाणा-या १० वर्षीय मुलीला बिबट्याने हल्ला करून फरफटत नेले. सोबत असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात येईपर्यंत मक्याच्या दाट शेतात ती दिसेनाशी झाली. तिच्या ओरडण्याचा आवाजही क्षीण झाला. एकीकडे बिबट्याची भीती तर दुसरीकडे मुलीला शोधण्याची धडपड अशा स्थितीत कुटुंबीयांनी तासभर मक्याचे शेत पिंजून काढले. त्यानंतर मध्यभागी मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडलेली पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

रेवानगर शिवारात रविवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास घडलेला हा प्रकार अंगावर शहारे आणणारा ठरला. दीपमाला नारसिंग पाडवी ही मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत शेतात जात होती. मका चांगला बहरल्याने आणि तो काढण्याची वेळ आल्याने त्यापूर्वी केलेली मानता फेडण्यासाठी कुटुंब शेतात जात होते. पुढे आजोबा आणि नात दीपमाला जात होते. शेताच्या बांधावरून जात असताना लगतच्या मक्याच्या शेतातून अचानक बिबट्याने मुलीवर हल्ला केला. आजोबा काही अंतरावर चालत असल्याने त्यांना काही क्षणानंतर हल्ला झाल्याचे कळले. तोपर्यंत बिबट्याने दाट असलेल्या मक्याच्या पिकात तिला फरफटत नेले होते.

शेतात आजोबांनी आरडाओरड करताच काही अंतरावर असलेले मुलीची आई, वडील आणि काका धावत आले. त्यांनी मक्याच्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याच्या हल्ल्याची भीती होतीच. आरडाओरड केल्याने इतरही काही जण धावून आले. अखेर मक्याच्या शेतात शोधकार्य सुरू असताना १ तासानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली आढलली. तिच्या गळ्यावर गंभीर जखम होती. शेतातून बाहेर काढल्यावर ती मयत झाल्याचे स्पष्ट झाले. ते पाहून नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी गणेश बुधावल शिवारात ४७ वर्षीय ललिताबाई पाडवी यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर २४ तासांतच रविवारी रेवानगर शिवारात ही घटना घडली. त्यामुळे तळोदा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सरदारनगर, बुधावल शिवारात वन विभागाने कॅमेरे, पिंजरे बसवले आहेत. पेट्रोलिंगही सुरू आहे. योग्य संधी मिळताच टॅक्युलाइझर गनने बेशुद्ध करून बिबट्याला रेस्क्यू करण्याची तयारी आहे असे वनक्षेत्रपाल शंतनू सोनवणे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR