भोपाळ : ब्राह्मण समाजात जन्मदर वाढवण्यासंदर्भात परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेले विधान चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राजोरिया म्हणाले की, ज्या कुटुंबात चार मुले जन्माला घातली जातील, त्यांना १ लाख रुपये दिले जातील. ब्राह्मण समाजातील तरुणांनी कमीत कमी चार मुले जन्माला घातली पाहिजेत, नाहीतर दुस-या धर्माचे लोक देशावर कब्जा करतील, असे विधान त्यांनी केले.
मध्य प्रदेशातील भोपालमध्ये आयोजित एका कार्यक्रमात परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया बोलत होते. इतर धर्मियांची संख्या वाढत आहे, कारण आपण (ब्राह्मण) आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणे बंद केले आहे. मला तरुणांकडून आशा आहे. आपण ज्येष्ठ लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही. तरुणांनी लक्ष देऊन ऐकावे. भावी पिढ्यांसाठी तुम्ही जबाबदार आहात. पण, आजकालचे तरुण आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर एक मूल जन्माला घालतात. त्यांना जास्त मुले नको आहे. यामुळे येणा-या काळात समस्या निर्माण होतील. मी आवाहन करतो की, तुम्हाला कमीत कमी चार मुलं असायला हवीत असे बोर्डाचे अध्यक्ष राजोरिया म्हणाले.
मुले जन्माला घालण्यात मागे राहु नका
तरुण अधूनमधून म्हणत असतात की, शिक्षण महाग झाले आहे. पण, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही महागाईत हालअपेष्टा होऊद्या, पण मुले जन्माला घालण्यात मागे राहू नका. नाहीतर दुस-या धर्माचे लोक या देशावर कब्जा करतील असेही त्यांनी म्हटले आहे.
भागवतांनीही व्यक्त केली होती चिंता
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही घटत्या जन्मदराबद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्या समुदायचा जन्मदर घटत जातो, तो पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मोहन भागवत म्हणाले होते. हिंदू धर्मियांनी जास्त मुलं जन्माला घालण्याच्या भूमिका यापूर्वीही अनेक व्यक्तींनी अनेकदा मांडल्या आहेत.