मुंबई : प्रतिनिधी
युतीबाबत मनसेने अत्यंत सावध भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांनीही आज वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी आधी निवडणुका तर जाहीर होऊ द्या, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही, लवकरात लवकर बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
५ जुलैच्या विजयी सभेनंतर ठाकरे बंधू एकत्र येणार असे वाटत होते. परंतु मनसेने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी तर काल वेगळेच वक्तव्य करून संभ्रम वाढवला. आत्तापर्यंतच्या निवडणूका आम्ही एकट्याने लढलो आहोत, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी होती. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधानभवनात आले तेव्हा याबाबत विचारण्यात आले. युतीसंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बोलू असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
इंडिया आघाडीची बैठक बोलवावी
यावेळी बोलताना इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे असेही उद्ध्व ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही, मला वाटते लवकरात लवकर बैठक झाली पाहिजे. बिहारमध्ये निवडणुका आहेत, इतरही राज्यात निवडणुका आहेत, महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे बैठक झालीच पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयावर शेवटची आशा
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आणि आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे, जिथे या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल. कारण आज आमचे जे चिन्ह चोरले गेले आहे. मी नेहमी सांगतो, निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे, परंतु पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही. कोणाचे नाव उचलून दुस-याला द्यायचे हा अधिकार निवडणूक आयोगाला नक्कीच नाही. त्यांना तो अधिकार असूच शकत नाही आणि आम्ही तो मान्यही करत नाही. निवडणूक चिन्हाबाबत म्हणाल तर ठीक आहे आणि त्याबाबत देखील प्रकरण कोर्टात आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.