बंगळूरू : कर्नाटक सरकारला काल सोमवारी ४ मार्च रोजी बंगळुरूला बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा ईमेल आला आहे. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली. या मेलमध्ये शनिवारी ९ मार्च बंगळुरूमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे लिहिले आहे.
ईमेलमध्ये म्हटले आहे की, हा स्फोट दुपारी २.४८ वाजता शहरात होईल, यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्री आणि बंगळुरू पोलिस आयुक्त यांना लक्ष्य केले जाईल. हा ईमेल शाहिद खान नावाने आला आहे. यासोबतच बस, ट्रेन, मंदिर, हॉटेल आणि अंबारी उत्सवातही बॉम्ब पेरण्यात आल्याचे धमकीमध्ये म्हटले आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर अधिका-यांनी कारवाई सुरू केली. सायबर क्राइम स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. बंगळुरू पोलिस आयुक्तांना वेगळी धमकी मिळाली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी बंगळुरू सायबर क्राइम पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. या धमकीच्या ईमेलनंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण कर्नाटकात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.