रांची : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची भेट घेतली. हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. तसेच आम्ही सर्व एकत्र येऊन न्यायासाठी लढा सुरू ठेवू, लोकांचा आवाज बुलंद करू. द्वेषाचा पराभव होईल आणि इंडिया जिंकेल असे काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. या यशानंतर काँग्रेसने झारखंडने हुकूमशहाचा अहंकार मोडून काढला आहे. जनता जिंकली आहे. इंडिया आघाडी सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पास केला आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन असे म्हटले आहे. जेएमएम खासदार महुआ माझी यांनी हा लोकशाहीचा विजय आहे. ज्या प्रकारे सर्व आमदार एकजुटीने राहिले ते हेमंत सोरेन यांच्यामुळेच शक्य झाले. काँग्रेस, राजद आणि सर्वांनी एकत्र येऊन रणनीती बनविल्याने अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली आहे असे म्हटले आहे.
हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई, मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आपला गड कायम राखला आहे. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतर चंपई सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला.
झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मंजुरी देण्यात आली होती. ४७ मतांसह चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विरोधात २९ मते पडली. तत्पूर्वी विधानसभा सभागृहात बोलताना हेमंत सोरेन यांनी भाजपा, केंद्र सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
अश्रू ढाळणार नाही
मी आदिवासी आहे, त्यामुळेच टार्गेट केले जात आहे. पहिल्यांदाच देशाच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली आहे. हार मानली नाही. आदिवासी दलितांबद्दल द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्हाला जंगलात जाण्यास सांगितले जात आहे. जर ते शक्य झाले तर ते आम्हाला जंगलात पाठवतील. अश्रू ढाळणार नाही. जमीन माझ्या नावावर आहे हे सिद्ध करण्यासाठी माझे अश्रू सावरीन.
आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन
माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. मला तुरुंगात डांबून त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकणार नाहीत. रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर रामराज्य आल्याचे बोलले जात आहे. पहिलेच पाऊल हे एका मुख्यमंत्र्यांला संपवण्याचे प्रयत्न करण्यात आले अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हल्लाबोल केला.