चंद्रपूर : वाघांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबविल्या जात असताना अवघ्या साडेचार महिन्यांत ७५ व्याघ्रमृत्यूची नोंद झाली आहे. यातही १२ एप्रिल ते १३ मेदरम्यान १६ वाघ देशाने गमावले. यातील आठ घटना मध्य प्रदेशात तर पाच महाराष्ट्रात घडल्या आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी ते १३ मे या चार महिन्यांत वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरित्या अशा विविध कारणांनी पंचाहत्तर वाघांचे मृत्यू झाले. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक २३ मृत्यूची नोंद झाली. चालू वर्षात देशात झालेल्या व्याघ्रमृत्यूंपैकी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांत मिळून आतापर्यंत ६१ टक्के मृत्यू झाले आहेत. वाघांच्या वाढत्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
मुळात प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून मागील पाच दशकांत देशात वाघांच्या संख्येत वाढ झाली. ही बाब समाधानकारक मानली जात असताना शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली. बहेलिया आणि बावरिया टोळ्यांकडून मागील पाच वर्षांत देशभरात शंभरहून अधिक वाघांच्या शिकारीच्या घटना घडवून आणण्यात आल्याचे समोर आले होते. जानेवारीमध्ये राजु-यात बहुचर्चित बहेलिया टोळीला अटक करण्यात आल्यानंतर शिकारीच्या अनुषंगाने अनेक तथ्य समोर आले. वाघांच्या अवयव तस्करीचे आंतरराष्ट्रीय नेटवर्कही स्पष्ट झाले होते. यातच रेल्वे अपघातही वाढल्याने सुरक्षित उपाय योजण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
२०२३ मध्ये सर्वाधिक घटना
मागील सव्वापाच वर्षांत सर्वाधिक व्याघ्रमृत्यू हे २०२३मध्ये झाले होते. मागील वर्षी ती संख्या १२४ होती. पण, यंदा केवळ साडेचार महिन्यांत व्याघ्रबळींनी पंचाहत्तरावी गाठली आहे.
अहवालातील सूचना अंमलबजावणीविना
जंगलातून जाणा-या रेल्वेच्या धडकेत वाघांसह अन्य वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. जुनोना येथे १५ नोव्हेंबर २०१८ रोजी रेल्वे अपघातात तीन वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चंद्रपूरचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी रेल्वेला सुचविल्या जाणा-या उपशमन उपाययोजनांबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वनाधिकारी, कर्मचारी व ‘एनजीओ’ने संपूर्ण रेल्वे ट्रॅक फिरून नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना अहवाल सादर केला होता. यात सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अजूनही करण्यात न आल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.