28.4 C
Latur
Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्रचला आता कामाला लागा

चला आता कामाला लागा

फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश निवडणुकीच्या तयारीला वेग

पुणे : येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. इतकेच नाही तर निवडणूक आयोगाने सुद्धा नवीन प्रभाग रचना करा, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. त्यानुसारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील प्रमुख पदाधिका-यांची एक बैठक घेतली. काल रात्री पुण्यात मुक्कामी असताना देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात ही महत्त्वाची अनौपचारिक बैठक बोलावली होती. या बैठकीला पुणे भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेत भाजपचा परफॉर्मन्स कसा आहे, निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची तयारी कशी आहे या संदर्भात सविस्तर आढावा पदाधिका-यांकडून घेतला. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा पुढचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचा विश्वास पदाधिका-यांसमोर व्यक्त केला आहे. तर, आपल्या १०५ जागा भाजपकडे कायम राहणार आहेत. थोडक्यात गेलेल्या जागांवर महायुतीमध्ये चर्चा केली जाईल. आपण महायुती म्हणून लढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू, तर निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच होतील असे फडणवीस या बैठकीत पदाधिका-यांशी बोलताना म्हणाले आहेत.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे १०० नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या १०५ जागांवर भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दावा ठोकला आहे. त्यामुळे जरी पुण्यामध्ये महायुतीची चर्चा झाली तर या १०५ जागा सोडून पुढील जागांवर चर्चा करण्यात येईल असा सूचक इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये पदाधिका-यांना दिला आहे. त्यामुळे संभाव्य १६६ नगरसेवकांपैकी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच १०५ जागांवर भाजपने दावा ठोकल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांना हा फॉर्मुला मान्य असणार का? यावर पुण्यातील संभाव्य महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

ते अपवादात्मक ठिकाण पुणे असणार?
कालच पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही ठिकाणी अपवाद असू शकतात. त्या ठिकाणी आमच्यात समजुतीनुसार वेगळी भूमिका घेऊ. एकमेकांवर टीका न करता, जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यानंतर पुण्यात मुक्कामी असणा-या फडणवीस यांनी पदाधिका-यांना १०५ जागांवर तयारी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता फडणवीसांचा हा फॉर्म्युला महायुतीतील इतर घटक पक्षांना मान्य होणार?, की जसं फडणवीस म्हणाले होते की अपवादात्मक ठिकाणी एकत्र लढता येणार नाही त्यानुसार हे अपवादात्मक ठिकाण पुणे असणार याकडे राज्याचे लक्ष लागल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR