22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयअग्निवीर योजना फाडून कच-यात फेकून देऊ

अग्निवीर योजना फाडून कच-यात फेकून देऊ

झाशी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी अखिलेश यादव यांनी औषधांची महागाई, कोरोना लसीचा धोका आणि गरीब रेशन या मुद्यावर भाष्य केले. ही निवडणूक म्हणजे महासागर मंथन आणि संविधान मंथनासारखी आहे. ही निवडणूक संविधान बदलण्याची भाषा करणा-यांच्या विरोधात मतदान करणार आहे असे अखिलेश यादव म्हणाले.

अखिलेश यांच्यानंतर राहुल गांधी यांनी मतदारांना संबोधित केले. यावेळी राहुल यांनी स्मार्ट सिटीचा मुद्दा उपस्थित केला. स्मार्ट सिटीच्या नावाने झाशीत छत्री टांगण्यात आली आहे असे राहुल म्हणाले. तसेच, भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधानाशिवाय भारतातील गरीब जनतेला स्थान नाही. इंडिया आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे. तर भाजपा, आरएसएस, नरेंद्र मोदी यांना हे संविधान फाडून फेकून द्यायचे आहे.

याचबरोबर, राहुल गांधी यांनी करोडो तरुण आणि महिलांचे जीवन बदलण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधी पुढे म्हणाले नरेंद्र मोदींच्या सरकारने २२ अब्जाधीशांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, तर आमच्या सरकारच्या काळात हा पैसा शेतक-यांच्या कर्जमाफीवर खर्च झाला. बुंदेलखंडमधील जनता आणि शेतक-यांसाठी आम्ही क्रांतिकारी काम करू. आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला लखपती बनवू.

पुढे राहुल गांधी म्हणाले की आम्ही अग्निवीर योजना फाडून टाकू आणि कच-यात फेकून देऊ. आम्ही शहीद जवानांसोबत भेदभाव करू देणार नाही. तसेच, मोफत धान्य योजना काँग्रेस सरकारने आणली होती. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही त्याअंतर्गत अधिक, चांगल्या दर्जाचे रेशन देऊ, असे सांगत गरीब, शेतकरी आणि कमकुवत लोकांचे सरकार बनवायला हवे, अंबानी-अदानी सरकार हटवायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR