सोलापूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केलेली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत नाही, उत्पन्नाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. काद्याची नियांत बंदी उठवावी, दूध दरवाढ करुन हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना पिकविमा द्यावा. तसेच औराद मंडलातील सर्व गावांचा दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी ठाकरे गट सेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख पाटील म्हणाले, आधीच शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. कसेतरी करून त्यांनी कांदा पिकवला आहे, मात्र केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी केरनी आहे. त्यामुळे व्यापारी कांद्याचे दर पाडत आहेत. याचा आर्थिक आणि मानसिक त्रास राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांवरील हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. तरी लवकरात लवकर कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात यावी. तसेच दूधालाही दरवाढ मिळत नसून लवकरात लवकर दूधाला देखील हमीभाव मिळावा.
सन २०२२-२३ मधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळाचे अनुदान मिळावे व राज्य शासनाने दुष्काळी यादीत दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश केला. परंतु तालुक्यातीलच औराद मंडळातील हत्तूर, राजूर, औराद, बंकलगी, होनमुर्गी, बिरनाळ, सिंदखेड, संजवाड, चंद्रहाळ, हत्तरसंग, कुडल, बोळकवठा आदी गावांचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने त्या गावातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.
दुष्काळ यादीत समावेश नसल्याने शेतकऱ्यांना वीज बिल सवलती, शेतसारा माफ, कर्ज वसुलीला स्थगिती आदी लाभ मिळणार नाहीत. तरी या गावांचा दुष्काळ यादीत समावेश करावा. यासह अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख पाटील यांनी सांगितले. अन्यथा ठाकरे गट सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख धर्मराज बगले, युवा सेना तालुकाप्रमुख आनंद थोरात, अमोल कारंडे, लायकअली पिरजादे, मगदूम शेख, निगराज हुळळे, रखमाजी पुजारी, गंगाधर कोळी, सरपंच संगप्पा कोळी, सचिन अणचे, महेश पाटील आदी उपस्थित होते.