मुंबई : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरू आहे. दोन दिवसापूर्वी शिवसेना नेत्या निलम गो-हे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात ठाकरे गटावर मोठा आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे असा खळबळजनक विधान नीलम गो-हे यांनी केले आहे. नीलम गो-हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून गो-हे यांच्यासह (अप्रत्यक्षपणे) तारा भवाळकर यांच्या विधानावरही भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्या निलम गो-हे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत, फडणवीस यांनी असा टोला निलम गो-हे यांचे नाव न घेता लगावला, तसेच यावेळी त्यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी केलेल्या विधानावरही टीका केली, फडणवीस म्हणाले, काही विशेषता जे साहित्यिक आहेत. त्यांना वाटत राजकारण्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊ नये. तशा पद्धतीचे त्यांचे नेहमी वक्तव्य असते. पार्टी लाईनवरच्या कमेंट करणे योग्य नाहीत, त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे, असे माझे मत आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्याने अनेकजण नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्र्यांनी पाठवलेल्या नावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता न दिल्याने काहींनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीदेखील आता आमच्या हातात आता काहीही राहिलेले नाही, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी हे मुख्यमंत्री ठरवतात असे विधान केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिकार मुख्यमंत्र्यांचेच असतात असे स्पष्टीकरण दिले आहे.