16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रबोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्रे आधारला जोडा!

बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्रे आधारला जोडा!

ठाकरे गटाची मागणी

मुंबई : विधानसभा निवडणूकीत बोगस मतदान रोखण्यासाठी सर्व मतदार ओळखपत्रे आधार कार्डशी जोडण्यात यावीत. तसेच मतदान केंद्रावर लागणारा वेळ, रांगा पाहून निरुत्साही होणा-या मतदारांमुळे मतदान कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिवसेनेने(ठाकरे) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी भरपूर वेळ लागला होता. त्यामुळे लांबच लांब रांगा वाढून मतदारांना तासनतास ताटकळत राहावे लागले. याचा मतदानावर परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कंिलगम यांची भेट घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली. बोगस मतदान रोखण्यासाठी दुबार नावांची संगणकीय नोंद करुन त्याचे दोन वेळा मतदान होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी शिवसेनेने दिलेल्या निवेदनात केली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर १२०० ते १५०० मतदार आहेत. ६० टक्के मतदान अपेक्षित धरले तर सरासरी ९३० मतदार व ६६० मिनिटे वेळ उपलब्ध आहे. म्हणजेच प्रत्येक मतदारासाठी फक्त ३९ सेकंद इतकाच वेळ मिळू शकतो. एवढ्या कमी वेळेत मतदानासाठी असणारी आवश्यक प्रक्रिया पार पडता येत नाही. यासाठी मतदान केंद्रे वाढवून प्रत्येक बूथवरील मतदारसंख्या आटोपशीर ठेवणे हाच उपाय आहे अशीही मागणी करण्यात आली आहे.

बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट युनिट व कंट्रोल युनिटमध्ये असलेल्या बॅटरीमधील इंडिकेटरमध्ये मतदान सुरु होण्याची तारीख व वेळ, बॅटरीचा कोड नंबर आणि मतदान सुरु करताना व बंद होताना किती बॅटरी चार्ज आहे याची नोंद पोलिंग यांना देण्यात येणा-या फॉर्म-१७ मध्ये नमूद करावी, तसेच मतदारांना मतदानकेंद्रावर विविध सोयी-सुविधा देण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान यातील तफावतीकडे काँग्रेसने लक्ष वेधले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR