पुणे : प्रतिनिधी
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले ‘दिल्लीतील साहित्य चिंतन’ हे पुस्तक सखोल चिंतन करून लिहिलेले आहे, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या वैचारिक भूमिकेतून दिल्लीत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाद्वारे माणूस माणसाला जोडला जाईल अशी अपेक्षा, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनातील भाषणांचे ‘दिल्लीतील साहित्य चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार अनंत गाडगीळ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी सरहद, संस्थापक अध्यक्ष संजय नहार व्यासपीठावर होते.
दिल्लीतील साहित्य चिंतन’ या साहित्यकृतीतून लेखकांना नवीन विचारधारा दिली जाईल तसेच नव्या पिढीला प्रेरणा मिळेल,असे ते म्हणाले. प्रास्ताविकात संजय नहार यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी भूमिका विशद केली. सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी तर आभार डॉ. शैलेश पगारिया यांनी मानले.