नवी दिल्ली : साहित्यातून मराठी राजकारणाचे प्रतिबिंब उमटत नाही. मराठी साहित्यिक वेगवेगळ्या विषयांवर लिहितात. राजकारण आज ज्या दिशेला चालले आहे त्याला एक नवे वळण देण्याचे काम मराठी साहित्यिक करतील का? असे प्रश्न ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ या परिसंवाद उपस्थित झाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉ. समीर जाधव, धीरज वाटेकर, पत्रकार शैलेश पांडे, सुरेश भटेवरा, संपादक संजय आवटे सहभागी झाले होते. डॉ. जाधव म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्या प्रकारे राजकारणावर थेटपणे बोलले गेले तशी एक वेगळी चळवळ आज उभी राहिली आहे.
त्या चळवळीविषयी थेटपणाने साहित्यिक बोलणार आहेत का? लेखक, साहित्यिक आजच्या राजकारणावर थेट भाष्य करत सत्य, वास्तव मांडतील का? साहित्याच्या परिप्रेक्षामध्ये सहजपणे यावे असे राजकारणात घडते आहे. पण जेव्हा अभिव्यक्तीच्याच वाटा बंद होतात तिथे साहित्यात काय उमटणार? असे परखड मत आवटे यांनी व्यक्त केले. सामना, सिंहासन या राजकीय पट असलेल्या चित्रपटांनंतर राजकीय कथानकाचा अभावच आढळतो. अशी कथानके साहित्यातून निर्माण व्हावीत ही साहित्यिकांची जबाबदारी आहे, अशी भूमिका सुरेश भटेवरा यांनी मांडली. लेखकांनाही प्रकाशकांच्या अपेक्षेनुसार साहित्य निर्मिती करावी लागते असे चित्रही पहावयास मिळत आहे.
राजकारणाला सत्याचा आधार लागतो. तो निखळला तर साहित्यच काय इतर कशालाच अर्थ नाही अस जयदेव डोळे म्हणाले. रंजनातून प्रबोधनाची वाटचाल फारशी होत नाही. साहित्यिकांनी राजकारणातील चांगल्या घटनांचाही विचार करायला हवा, अशी अपेक्षा शैलेश पांडे यांनी व्यक्त केली. राजकारण फार बहुरंगी, बहुढंगी आहे ते तसे चित्रित करण्याची क्षमता लेखकांत असते.