धाराशिव : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरून उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे अवैध कत्तलखान्यावर १३ डिसेंबर रोजी कारवाई केली. यावेळी पोलीसांनी २१ जनावरांची सुटका केली. या प्रकरणी तीघांच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुंजोटी येथे कारवाई केली.
गुंजोटी येथे जनावरांची अवैध कत्तल होत असल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस हावलदार प्रकाश औताडे, विनोद जानराव, शौकत पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, चालक हावलदार महेबुब अरब, दफळ यांचे पथक हे दि.१३ डिसेंबर रोजी दाखल झाले. गुंजोटी येथे कुरेशी गल्लीत अवैध कत्तलखान्यात छापा टाकला. या ठिकाणी असलम मोहम्मद कुरेशी, इम्रान जहीर कुरेशी, इरफान मजहर कुरेशी हे आढळून आले.
त्यांना जनावराबाबत चौकशी केली असता त्यांनी ही जनावरे कत्तली करीता आणल्याचे सांगितले. त्या ठिकाणी अवैध कत्तल करण्याकरीता बांधलेले ६ बैल, २ म्हैस, ८ रेडे, २ रेडकु, ३ गोवंशीय वासरे व कत्तल केलेल्या जनावरांची ४ शिंगे अशी एकूण ५ लाख २६ हजार रूपये किंमतीची जनावरे आढळून आली. आरोपी यांचे विरुध्द उमरगा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.