मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांच्या हानीचे पंचनामे सुरू आहेत. आता कोळी युवाशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याने तहसील कार्यालयातून वसईतील मच्छिमारांच्या सुक्या मासळीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.
आतापर्यंत दीडशेहून अधिक पंचनामे झाले आहेत. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवले जातील, असे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी सांगितले.
गेल्या रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे माध्यमांमध्ये शेतक-यांच्या नुकसानीची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांनीही शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या.
त्याच वेळी मत्स्यदुर्भिक्षामुळे मेटाकुटीस आलेल्या मच्छिमार समाजाकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाल्याची स्थिती होती. पाचूबंदर-किल्लाबंदर येथील कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन सुक्या मासळीच्या हानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
पाचूबंदर-किल्लाबंदर येथील किनारा बेकायदा वाळूउपशामुळे आधीच वाहून गेल्यामुळे गरीब कोळी महिलांचा मासळी सुकवण्याचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. मात्र आजही काही महिला मोठ्या कष्टाने मासळी वाळवण्यासाठी जेट्टी, चौथरे अशा ठिकाणी जेथे जागा मिळेल तेथे उन्हातान्हात मासळी सुकवतात व त्यावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील या महिलांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. सुकवण्यासाठी ठेवलेले बोंबील, मांदेली, वाकटी, बलवट इत्यादी प्रकारची मासळी अवकाळीमुळे खराब झाली. या महिलांना शासनाकडून मदतीचा आधार मिळणे गरजेचे आहे,
ही बाब कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांच्यासह संजय मानकर, विशाल पाटील, ब्लेस जान्या यांनी वसई तहसीलदार यांची बुधवारी भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणली होती. तहसीलदार कोष्टी यांनी त्वरित मंडळ अधिकारी सुनील राठोड यांना याप्रकरणी प्रत्यक्ष किना-यावर जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्याच्या तथा त्यानुसार पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.