कोलकाता : आज झालेल्या चुरशीच्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या शानदार फलंदाजीनंतरही कोलकाता नाईट रायडर्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत तीन गडी गमावून २३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरला निर्धारित षटकांत ७ गडी गमावून केवळ २३४ धावा करता आल्याने लखनौने केवळ ४ धावांनी विजय मिळविला.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील २१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती. या खेळपट्टीचा लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. २० षटकांत ३ गडी गमावून २३८ धावा केल्या आणि विजयासाठी २३९ धावांचे आव्हान दिले. यावेळी मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी आक्रमक खेळी केली.
मिचेलने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार मारत ८१ धावा केल्या. तर निकोलस पूरनने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने नाबाद ८७ धावांची खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ७ गडी गमावून २३४ धावा केल्या. पण विजयासाठी ४ धावा कमी पडल्या. कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यरने चांगली खेळी केली. अजिंक्य रहाणेने ३५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार मारत ६१ धावा केल्या. तर वेंकटेश अय्यरने २९ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार मारत ४५ धावा केल्या. तर रिंकु सिंहने १५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ३८ धावा केल्या. रिंकु सिंहने विजय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. पण आवेश खानच्या षटकात दोन बॉल डॉट गेल्याने प्रेशर वाढले. तसेच शेवटच्या चेंडूवर चौकार आल्याने स्ट्राईक बदलली आणि गणित चुकले.