लखनौ : आयपीएल २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. मात्र त्यानंतर सलग पाच पराभवांचे तोंड पाहीले होते. आता लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे.
लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ७ गडी गमवून १६६ धावा केल्या आणि विजयासाठी १६७ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान तसे पाहिले तर या मैदानावर खूपच कठीण होते. शाईक रशीद आणि रचिन रविंद्रने चांगली सुरुवात केली. ५२ धावांची भागीदारी केली आणि पहिली विकेट गमावली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि रविंद्र जडेजा काही खास करू खले नाहीत. विजय शंकरची विकेटही झटपट पडली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघावर दडपण वाढले. पण महेंद्रसिंह धोनी आणि शिवम दुबे या जोडीने विजयश्री खेचून आणला. महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला आला तेव्हा ३० चेंडूत ५५ धावांची गरज होती. मात्र महेंद्रसिंह धोनी आपला जुना अंदाज दाखवला आणि फिनिशरची भूमिका बजावली.
महेंद्र सिंह धोनी आणि शिवम दुबे यांनी ५५ धावांची विजयी भागीदारी केली. यावेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ११ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी केली. तर शिबम दुबेने संथ पण सावध खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. शिवम दुबने ३७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ४३ धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेले १६७ धावांचे आव्हान ५ गडी गमवून १९.३ षटकांत पूर्ण केले.
लखनौ सुपर जायंट्सकडून ऋषभ पंतने मोठी खेळी केली. एकीकडे एडम मार्करम आणि निकोलस पूरन स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने डाव सावरला. त्याने ४९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे संघाला १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. मिचेल मार्शने ३०, आयुष बदोनीने २२, अब्दुल समदने २० धावा केल्या. तर शार्दुल ठाकुरने शेवटी येत ४ चेंडूत ६ धावांची खेळी केली.