लखनौ : आयपीएल २०२५ च्या २६ व्या मॅचमध्ये गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८० धावा करीत लखनौसमोर १८१ धावांचे आव्हान ठेवले होते. तर लखनौने सदर आव्हान सहज पेलत नियोजीत १९.३ षटकांत ४ गडी गमावत १८६ धावा केल्या आणि दमदार विजय मिळविला.
अखरेच्या क्षणी इम्पॅक्ट प्लेअर आयुष बदोनी याने केलेल्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानात आयपीएलच्या १८ व्या मोसमात सलग तिसरा आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. लखनौने गुजरात टायटन्सवर ६ विकेट्सने धमाकेदार विजय साकारला. लखनौने यासह गुजरातला सलग पाचवा विजय मिळवण्यापासून पद्धतशीर रोखले.
शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरातने १८० धावांपर्यंत मजल मारली. लखनौकडून एडन मारक्रम आणि निकोलस पूरनसह रिषभ पंत आणि बदोनीने चांगली फलंदाजी केली. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये लखनौने बाजी मारली. बदोनीने लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, त्याने २८ धावा केल्या. या पराभवामुळे गुजरात गुणतालिकेत दुस-या स्थानावर घसरले.
लखनौच्या डावाची सुरुवात एडन मारक्रम आणि रिषभ पंतने केली. दोघांनी १० च्या धावगतीने फलंदाजी करत लखनौला चांगली सुरुवात करून दिली. रिषभ पंत ४ चौकार मारत २१ धावांवर बाद झाला. तर, एडन मारक्रम आणि निकोलस पूरन या दोघांनी अर्थशतके झळकवली. एडन मारक्रम याने ९ चौकार आणि १ षटकार मारत ५८ धावांची खेळी केली.
निकोलस पूरन याने फलंदाजीला येताच आक्रमक रुप धारण केले. पूरन याने षटकार मारण्यावर लक्ष केंद्रीत केले. पूरनने ७ षटकार आणि १ चौकार मारत ६१ धावा केल्या. पूरनला राशिद खान याने बाद केले. यानंतर धोकादायक डेव्हिड मिलरला बाद करुन लखनौवर दबाव वाढवण्याची संधी जोस बटलरने गमावली आणि गुजरातचा संघ आणखी अडचणीत आला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने मिलरला ७ धावांवर बाद केले.