17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeसंपादकीय विशेषमहानायकाचा महागौरव

महानायकाचा महागौरव

  • महाराष्ट्र शासनाचा यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात येणार आहे, ही तमाम मराठी रसिकप्रेक्षकांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. मराठी आणि हिंदीतील नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही प्रांतात मुशाफिरी करून आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणा-या अशोकजींना पंच्याहत्तरीनिमित्त चाहत्यांच्या वतीने शासनाने दिलेली ही एक उत्तम भेट म्हणावी लागेल. त्यांच्यासोबत चार चित्रपट करण्याची संधी मला मिळाली. ‘भस्म’ सारख्या लो बजेट चित्रपटामध्ये एक पैसाही मानधन न घेता अशोकजींनी काम केले, ही आठवण त्यांच्याविषयी खूप काही सांगणारी आहे. प्रेक्षक, दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार या सर्वांच्यात लोकप्रिय असणारे अशोकजींचे या पुरस्काराबद्दल त्रिवार अभिनंदन.

मराठी नाटक, चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या चतुरस्त्र अभिनयाने दिलखुलास मुशाफिरी करणा-या अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाने यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराबद्दल अशोकजींचे सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. या पुरस्काराबाबत आनंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्यांदाच एका जवळच्या व्यक्तीला तो मिळाला आहे. आजवर लतादीदी, आशाताई यांच्यासारख्या दिग्गजांची निवड या सन्मानासाठी केली गेली. अशोकजी या पंक्तीत विराजमान होण्याइतके मोठे निश्चितच आहेत. त्यांची निवड केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचेही अभिनंदन. अलीकडेच अशोकजींची पंच्याहत्तरीही संपन्न झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने एक मोठी भेट तमाम मराठी रसिकांच्या वतीने आणि अशोकजींच्या चाहत्यांच्या वतीने दिली आहे, असे मला वाटते. सद्यस्थिती पाहता त्यांच्या निवडीबाबत कुणाचेच दुमत असणार नाही असे वाटते.

आमच्यासारख्या रंगकर्मींना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही एक प्रकारे भाग्याचीच गोष्ट म्हणायला हवी. आजवरच्या अनुभवातून मला जाणवलेली बाब म्हणजे अभिनयाबाबतचा अशोकजींचा दृष्टिकोन अत्यंत प्रोफेशनल राहिला आहे. किंबहुना त्यामुळेच ते इतकी वर्षे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय राहिले. मी अगदी तरुणपणापासून अशोकजींच्या भूमिका पाहात आलो आहे. सुरुवातीला ते बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. त्यावेळी बँकांतर्फे आयोजित केल्या जाणा-या एकांकिकांमध्ये पहिल्यांदा त्यांनी अभिनय केला. विशेष म्हणजे एक-दोन एकांकिकांमधूनच ते इतके गाजले की पुढे ताबडतोब त्यांना चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीची दारे खुली झाली. नाटकांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. ‘पेईंग गेस्ट’ असेल किंवा विजयाबाई मेहतांचे ‘हमिदाबाईंची कोठी’ असेल यांसारख्या नाटकांमधून त्यांच्यातील अभिनयक्षमता सर्वांच्याच लक्षात आली.

गजानन जहागिरदारांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा त्यांचा पहिला चित्रपटही त्याच काळात आला. बँकेतील नोकरी, नाटक आणि सिनेमा या तिन्ही आघाड्यांवर लढणे ही अशोकजींसाठी तारेवरची कसरत होती. पण सुरुवातीपासूनच सर्वांसोबत मिळून मिसळून काम करण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. मुख्य म्हणजे कमिटमेंट पाळणे हा विशेष वाखाणण्याजोगा गुण त्यांनी सदैव जपला. यामुळे सर्व निर्मात्यांसोबतचे त्यांचे संबंध चांगले राहिले. सिनेमाच्या क्षेत्रात निर्मात्यांची मर्जी असणे ही बाब खूप महत्त्वाची असते. केवळ दिग्दर्शकांना एखादा कलाकार पसंत असणे पुरेसे ठरत नाही. अशोकजी दिग्दर्शकांबरोबरच निर्मात्यांच्याही पसंतीचे ठरले. मुख्यत्वे करून अशोकजींची विनोदाची शैली लोकांना आपलीशी वाटली. आपल्यातलाच एक, सामान्य वाटणारा माणूस पडद्यावर हिरोच्या रूपात पाहताना प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद वाटायचा. रुढार्थाने ज्याला ‘हिरो मटेरियल’ म्हटले जाते ते अशोकजींमध्ये नव्हते; परंतु मिळालेल्या व्यक्तिरेखा ज्या ताकदीने आणि भन्नाट शैलीने ते सादर करायचे त्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

मला आठवतंय, ‘पांडू हवालदार’ चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा दादा कोंडके हे प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होते. त्यांची कारकीर्दही मोठी होती. असे असूनही या चित्रपटानंतर दादा कोंडकेंच्या बरोबरीने अशोक सराफांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. आजही हा चित्रपट पाहिल्यास दादा कोंडके तर लक्षात राहतातच; पण अशोक सराफ यांचे वेगळेपणही ठसल्याशिवाय राहात नाही. या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरचा आलेख उंचावत गेला. नंतरच्या काळात अनेक निर्माते त्यांच्याकडे आकर्षित झाले. इतकेच नव्हे तर अशोक सराफ यांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मिती केली जाऊ लागली. त्यांच्यासाठी कथानके लिहिली जाऊ लागली. पुढच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डेंची एन्ट्री झाली आणि या जोडीने उभ्या महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले. सिनेमा असो किंवा चित्रपट, त्याबाबतचा प्रस्ताव स्वीकारताना अशोकजी त्या भूमिकेला मी न्याय देऊ शकतो का, याचा विचार प्राधान्याने करतात. त्यामुळे लक्ष्मीकांत आणि त्यांच्या जोडीचे गारूड उत्तरोत्तर वाढत गेल्यानंतर अशोकजींनी नाटकांमधील अभिनयाला अर्धविराम दिला. चित्रपटांवर पूर्ण फोकस करून त्यांनी कधी व्हिलन, तर कधी नेता, कधी नायक, कधी मोठा भाऊ अशा अनेक छटा असणा-या भूमिका त्यांनी केल्या. यातून त्यांची कारकीर्द बहरत गेली.

मी लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर चार चित्रपट केले. त्यापैकी ‘हमाल दे धमाल’ हा माझा पहिला चित्रपट. लक्ष्मीकांत हा घरचाच असल्यामुळे अशोक सराफांविषयीच्या चर्चा आमच्यात नेहमी असत. त्याच्याकडून अशोकजींच्या कामाच्या पद्धतीविषयीच्या अनेक गोष्टी समजत असत. ‘घायाळ’ हा माझा चौथा चित्रपट. एन. चंद्रांची निर्मिती असणा-या या चित्रपटामध्ये मधुकर तोरडमल यांच्या मोठ्या मुलाची भूमिका अशोकजींनी केली. या चित्रपटाविषयी, कथानकाविषयी, व्यक्तिरेखेविषयी त्यांना जेव्हा सांगितले तेव्हा त्यांना ते खूप आवडले. परंतु चित्रपटात मोठी स्टारकास्ट असली तरी तुमची व्यक्तिरेखाही तितकीच महत्त्वाची आहे, हे त्यांना पटवून द्यावे लागले. कारण अशोक सराफांचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोणत्याही चित्रपटासाठीचा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर ते लागलीच होकार देत नाहीत. सिनेमाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यामध्ये त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, त्यामध्ये अभिनयाला किती वाव आहे, ते त्याला किती न्याय देऊ शकतात याचा सांगोपांग विचार करून मगच ते होकार अथवा नकार कळवतात. अर्थात, काही निर्माते-दिग्दर्शकांनी ‘तुम्ही आमच्या चित्रपटात काम केलं तर बरं होईल’ असा आग्रह धरल्यानंतर माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

पण जेव्हा चांगला दिग्दर्शक त्यांना भेटतो तेव्हा ते जास्त चौकस असतात. कारण अशा चित्रपटातील भूमिकेला आपण चांगला न्याय दिला पाहिजे, जेणेकरून तो चित्रपट यशस्वी व्हावा अशी त्यांची धारणा असते. त्याचबरोबर एखादी स्क्रिप्ट वाचून ते नकारही देतात. माझ्याबाबत सांगायचे तर मी त्यांच्यासोबत जे चार चित्रपट केले त्या चारही चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचून त्यांनी होकार दिला. ‘भस्म’ चित्रपटासंदर्भातला अनुभव मला आवर्जून सांगावासा वाटतो. ‘घायाळ’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने आम्ही सर्व जण कोल्हापूरला गेलो होतो. अशोकजी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तेथे त्यांना निरोप देण्यासाठी मी ११ वाजता गेलो होतो. त्यावेळी उत्तम बंडू तुपे यांचे ‘भस्म’ हे पुस्तक माझ्या हातामध्ये होते. मी हातात पकडून त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी ते पुस्तक घेतलं, सारांश वाचला आणि यावर तू चित्रपट करतो आहेस का असे विचारले. मी ‘हो’ असे सांगितल्यानंतर त्यांनी शंकराची भूमिका कोण करणार आहे असे विचारले. मी तेव्हा या व्यक्तिरेखेसाठी कुणाचीच निवड केलेली नव्हती. अशोकजी तेव्हा प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे त्यांचे मानधनही मोठे होते.

‘घायाळ’साठीचा अनुभव माझ्या गाठीशी होता. पण ‘भस्म’ हा तसा कमी बजेटचा चित्रपट होता. त्यामुळे अशोकजींसाठी मोठी रक्कम देता येणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी अजून कास्टिंग केलेले नाहीये आणि चित्रपटाचे बजेट खूप कमी आहे असे स्पष्ट सांगितले. यावर ‘मी पैशांचे काही बोललो का तुला, ही भूमिका कोण करणार आहे ते सांग’ असे ते म्हणाले. तेव्हा ‘आपल्यासारख्या दिग्गज कलाकाराने ही भूमिका केल्यास माझ्या सिनेमाची उंची वाढेल’ असे मी म्हणालो. यावर त्यांनी ती कादंबरी वाचायला दे, मी दोन दिवसांत तुला कळवतो असे सांगितले. दोन दिवसांनी त्यांचा फोन आला आणि मी शंकराची भूमिका करतो आहे असे सांगितले. मी लागलीच विचारले की, आपल्या व्यवहाराचे कसे ठरवायचे? यावर त्यांचे उत्तर होते की, मी तुला एका शब्दाने पैशांचे विचारलेले नाहीये. तू उगीच टेन्शन घेऊ नको. मला या भूमिकेसाठी एकही पैसा देऊ नकोस. फक्त माझा ड्रायव्हर आणि मेकअपमन यांचे पैसे अदा कर.

पण तू हा सिनेमा कर. दिलेल्या शब्दाप्रमाणे खरोखरीच ‘भस्म’मधील भूमिकेसाठी त्यांनी एकही पैसा घेतला नाही. व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करताना वाजवी आणि योग्य मानधन हक्काने मागणा-या अशोकजींची ही आठवण मी कधीच विसरू शकणार नाही. ही भूमिका तशी आव्हानात्मक होती. या व्यक्तिरेखेसाठी त्यांच्या डोक्यावरचा विग जवळपास दीड-दोन किलोंचा होता. त्यांचा मेकअप करण्यासाठी एक-दीड तास लागायचा. साहजिकच चित्रीकरणाच्या दोन तास आधी त्यांना पोचावे लागायचे. बजेट कमी असल्याने घराजवळ मुलुंडमधील एका पाड्यात आम्ही मराठवाड्याची पार्श्वभूमी असणारा सेट उभा केला होता. त्यावेळी अशोक सराफ सकाळच्या सातच्या शिफ्टसाठी अंधेरीहून निघून पाच-साडेपाच वाजता हजर असायचे. चित्रीकरण संपायला कधी-कधी रात्री एक-दीड वाजायचे. त्यानंतर घरी जाऊन दुस-या दिवशी ठरलेल्या वेळेत पहाटे पाच वाजता ते येत असत. फिल्मसिटीमध्ये उन्हातान्हात त्यांनी या चित्रटाचे शूटिंग केले. असा हा ‘भस्म’चा एक वेगळा अनुभव आहे. आजही त्यांच्यासाठी या चित्रपटातील भूमिकेचे एक वेगळे स्थान आहे.

ज्या अशोक सराफांना विनोदी धाटणीच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिले, व्हिलन म्हणून पाहिले त्यांना ‘भस्म’ मधून एका वेगळ्याच रूपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. त्यावर्षीचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अशोकजींना मिळाला असता तर हॅट्ट्रिक झाली असती. कारण आधीची दोन वर्षे सलग त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार मिळाला होता. पण ‘भस्म’साठी तो दिला गेला नाही. याबाबत त्यांनाही काहीसे वाईट वाटले. अशोकजी संयत स्वभावाचे असल्याने ते आनंदही फार कर्कशपणाने व्यक्त करत नाहीत आणि वाईट वाटल्याचेही फार तीव्रतेने दाखवत नाहीत. ते स्थितप्रज्ञ असतात. त्यामुळे त्यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली नाही. पण तेव्हा चुकलेल्या हॅट्ट्रिकची कसर आता ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने भरून निघाली असे म्हणावे लागेल. अशोकजींनी ज्या समर्पणाने आपली अभिनयाची कारकीर्द घडवली त्या कारकीर्दीला साजेसा हा पुरस्कार आहे.

-पुरुषोत्तम बेर्डे,
ज्येष्ठ दिग्दर्शक, नाट्यलेखक, एकांकिकार

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR