कोल्हापूर : राज्यामध्ये भाजप, शिंदे सेनेचे नेते उघडपणे गोळीबार करत आहेत. गुंडांचा नंगा नाच चालू असताना कोणाचाही वचक राहिलेला नाही. महाराष्ट्र हे गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी कोल्हापुरात केली. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आज दानवे यांनी घेतले.
यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान यावेळी बोलताना दानवे म्हणाले, ‘पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीच्या वेळी अभिलेखावरील तुरुंगातील गुंडांना पॅरोलवर सोडले होते. त्यांचा राजकारणासाठी वापर केला गेला. आजही महाराष्ट्रात गुंडांचेच राज्य आहे. जमिनी बळकावण्याचे, हडपण्याचे उद्योग सरकारी आशीर्वादाने सुरू आहेत. अशा राज्यात जनता असुरक्षित आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान किसान सन्मान योजना म्हणजे शेतक-यांच्या डोळ्यात धूळफेक आहे, असा उल्लेख करून ते म्हणाले, ही योजना सुरू झाली तेव्हा राज्यामध्ये एक कोटी ५२ लाख खातेदार होते. आता पंधरावा हप्ता दिला तेव्हा ही संख्या ८० लाखांवर आली आहे. शेतक-यांची संख्या वाढणे अपेक्षित असताना त्यात सतत कपात होत चालली आहे. याचा अर्थ ही योजना गुंडाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे सुरू केल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. याविषयी बोलताना दानवे म्हणाले, एक रेल्वे सुरू केली म्हणजे देशाचे परिवर्तन घडून येईल असे थोडेच असते. देशाची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. परदेशी धोरण अपयशी ठरले आहे. अमृतकाळाचा एक थेंबही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.