13 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुस-या स्थानी

ज्येष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुस-या स्थानी

राज्यात ५ हजार ६९ गुन्हे दाखल एनसीआरबीने जाहीर केली आकडेवारी

नागपूर : देशात वृद्ध नागरिकांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये देशभरात २८ हजार ५४५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये महाराष्ट्र दुस-या स्थानावर आहे. राज्यात ५ हजार ६९ गुन्हे दाखल असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

सर्वाधिक ६ हजार १८७ गुन्हे मध्य प्रदेशात दाखल आहेत. दुस-या क्रमांकावरील महाराष्ट्रात ज्येष्ठांवरील अत्याचारांचे ५ हजार ५९ गुन्हे दाखल आहेत. तिस-या स्थानावर तामिळनाडू (२,३७६), चौथ्या स्थानावर तेलंगणा (२,१८१) आणि पाचव्या स्थानावर आंध्र प्रदेश (२,११४) आहे. स्थावर मालमत्ता, जमिनीची, संपत्तीची वाटणी आणि लुटमार करण्याच्या उद्देशातून हे गुन्हे घडले आहेत. ज्येष्ठांच्या हत्याकांडाच्याही घटनांमध्ये वाढ झाली आहे.

तीन टक्के खून हे अनैतिक संबंध, प्रेमसंबंध किंवा प्रेमसंबंधात अडसर ठरल्यामुळे घडले आहेत. वृद्धांच्या विविध प्रकारे फसवणूक झाल्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या (८५८ गुन्हे) स्थानावर आहे. यामध्ये ऑनलाईन फसवणूक, पोलिस असल्याचे सांगून लुबाडणूक आणि हनीट्रॅप करून फसवणूक केल्याच्या घटनांचा समावेश आहे.

राज्यात १९८ वृद्धांचे खून
देशात वृद्धांच्या हत्याकांडाचा आकडा १ हजार ३१८ एवढा असून सर्वाधिक हत्याकांडाची नोंद तामिळनाडूत झाली आहे. येथे २०१ ज्येष्ठांच्या हत्या झाल्या. महाराष्ट्रात १९८ वृद्धांचा खून करण्यात आला. ६२ वृद्धांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठांच्या हत्याकांडात बहुतांश मुलगा, भाऊ, पत्नी, नातेवाईक किंवा ओळखीचाच आरोपी निघाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR