19.2 C
Latur
Tuesday, November 12, 2024
Homeसोलापूरमहावितरण देणार गुळवंचीच्या भजनावळे कुटुंबीयांना नुकसानभरपाई

महावितरण देणार गुळवंचीच्या भजनावळे कुटुंबीयांना नुकसानभरपाई

सोलापूर : गुळवंची येथे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या १९ म्हशींची नुकसानभरपाई वीज मंडळ प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे देणार आहे. वीज मंडळाकडून अपघातात गाय अथवा म्हैस मृत झाली तर नुकसानभरपाई देण्याची जी तरतूद आहे, त्यानुसार भजनावळे कुटुंबाला भरपाई दिली जाणार आहे. उत्तर तालुक्यातील गुळवंची येथील विष्णू भजनावळे यांच्या १९ म्हशी विजेची तार तुटून पाण्यात पडल्याने करंट बसून मृत झाल्या होत्या. हा अपघात ४ जून रोजी झाला होता. त्यानंतर आमदार यशवंत माने यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. पंढरपुरी म्हशी असल्याने व त्यातील जवळपास १७ म्हशी गाभण असल्याने म्हशींची किंमत लाखांपेक्षा अधिक होत आहे.

पशुसंवर्धन खात्याने तशी अहवालात किंमतही नमूद केली आहे.या अहवालाच्या आधारे म्हशीची नुकसानभरपाई मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, महावितरण त्यांच्या पद्धतीने रक्कम देणार आहे. एका मोठ्या म्हशीची किंमत ३० हजार रुपयांप्रमाणे मिळेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.वीज मंडळाच्या अपघातात (तार तुटून अथवा पोलला चिकटून शॉक लागून) शेळी मृत झाली, तर एका शेळीसाठी तीन हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. शेळ्ळ्या राखणारा कष्टकरी माणूस गरीब असतो. अशा कष्टकऱ्याची शेळी करंट बसून मृत झाली तर तीन हजार रुपये मिळतात. शॉक लागल्याने मृत झालेल्या शेळी अथवा जनावरांचा पंचनामा, पोस्टमार्टम त्याची कागदपत्र पोलिस, पशुसंवर्धन, तहसील कार्यालय व वीज मंडळाला पोहोच करण्यासाठी शेतकऱ्याला चार पैसे खर्च करून हेलपाटे मारावे लागतात. तीन हजार रुपये शेळीची नुकसानभरपाई वीज मंडळ देते.महावितरण गाय- म्हैस नुकसानभरपाई प्रत्येकी ३० हजार रुपये देते. राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार एका गायीची किंमत ७० हजार, तर म्हैस किंमत ८० हजार रुपये दर ठरविला आहे. हाच जुना दर (मागील वर्षांपर्यंत) ३५ व ४० हजार रुपये होता. राज्य सरकारने आता गाय व म्हैस ७० व ८० हजार रुपये खरेदी दर ठरविला असला तरी वीज मंडळाकडे मात्र जुनाच दर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR