मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंर्त्यांमुळे राज्यातील सद्भाव, विवेक, महाराष्ट्र धर्म नष्ट होत आहे. जातीय सलोखा बिघडत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.
सिंधुदुर्ग येथे प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणच्या या भूमीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वी. स. खांडेकरांचा जन्म झाला,मंगेश पाडगावकर, मधू दंडवते, नाथ पै यांच्यासारख्या महान नेत्यांचा हा जिल्हा आहे, एकापेक्षा एक सरस खासदार या जिल्ह्यातून झाले,
ज्यांनी सभ्यता, संस्कृती व लोकशाही मुल्ये कशी असतात याचा आदर्श घालून दिला आहे. आज त्याच जिल्ह्यातील काही लोकांच्या तोंडातून दररोज गटारगंगा वाहत असते. एक मंत्री हम करे सो कायदा म्हणतो, दुसरा आमदार सैराट आहे. आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही अशी धमकी दिली जाते, हा सर्व प्रकार महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रकार आहे अशी टीका त्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २०० वर्षानंतर महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली. या दोनशे वर्षामध्ये भाजपाच्या त्याकाळातील पिल्लावळींना महाराजांचा इतिहास पुढे आणू द्यायचा नव्हता, आताही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एकही पुरावा ठेवायचा नाही यातून काही विध्वंसह घटना या लोकांना करायच्या आहेत. या विखारी विचारसरणीला थांबवावे लागणार आहे. असेही सपकाळ म्हणाले.
नारायण राणे हे दुस-या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते १२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिले त्यातील ९ वर्षे ते सत्तेत राहिले, त्यांचा परभाव झाल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना निवडून दिले पण नंतर ते कडगोळे घेऊन दुस-यÞा पक्षात गेले. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते व सत्ता होती म्हणून ते आले होते व सत्ता नाही हे दिसताच ते परत गेले. ते जरी गेले असले तरी या जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता व काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. या जिल्ह्याच्या पालकमंर्त्याला कोकणात सामाजिक तेढ निर्माण करायचे आहे,
संस्कृती मोडून काढायची आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जनतेचे प्रश्न हाती घेऊन काम करा.पुष्पा चित्रपटातील झुकेगा नही साला या भावनेने काम करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला पाहिजे, प्रत्येक तालुका, वार्ड, ग्रामपंचायतीत काँग्रेसचा कार्यकर्ता दिसला पाहिजे. काँग्रेस एक चळवळ आहे, काँग्रेसचा विचार जिवंत ठेवा, हा विचार जिल्ह्यातील घरोघरी पोहचवा असे आवाहन सपकाळ यांनी केले.