मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक मतदारसंघात दोन, दोन नेत्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. काही नेत्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे उघड-उघड नाराजी व्यक्त केली तर महायुतीमधील काही नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
भाजपला बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आलेले नाही. ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता मानली जाते त्या जागांवर बंडखोर मोठ्या संख्येने लढत आहेत. यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबादेवी : शायना एनसी यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर केली. पण याच मतदारसंघात आता भाजपाच्या अतुल शाह यांनी बंडखोरी केल्याचे समोर आले आहे.
शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली, पण भाजपचे सम्राट महाडिक यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज पाठिमागे घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.
बोरीवली : पश्चिम बोरीवली मतदारसंघात भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
अकोला पश्चिम : भाजपकडून विजय अग्रवाल यांची उमेदवारी जाहीर होताच निवडणूक लढवू इच्छिणारे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अशोक ओळंबे यांनी भाजपचा राजीनामा देत प्रहारमधून आपला अर्ज दाखल केला आहे.
वांद्रे पूर्व : येथे अजित पवार गटाने झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी घोषित केली, तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कुणाल सरमळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.