नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महायुतीने आतापर्यंत १८२ जागांवर उमेदवार घोषित करत आघाडी घेतली आहे. भाजपने पहिल्या यादीत ९९, शिंदे गटाकडून ४५ तर अजित पवार गटाकडून ३८ उमेदवार मिळून १८२ जणांची यादी जाहीर केली. मात्र, अजून १०६ जागांवर घोडे अडले आहे. त्यातच कोणता पक्ष किती जागा लढवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल दिल्लीत दाखल झाले असून, तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत खलबते सुरू आहेत.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे जागावाटपावर चर्चा झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज महायुतीतील नेते दिल्लीला रवाना झाले असून, तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शाह यांनी शिंदे आणि अजित पवार यांना जागावाटपात तडजोड करण्याचा सल्ला दिला आहे. महायुतीत शिंदेंच्या तुलनेत अजित पवारांना कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपातील १०६ जागांवर अंतिम तोडगा काढण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात भाजपने ९९, शिंदे गटाच्या शिवसेनेचे ४५ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या ३८ जागांचा समावेश आहे. आतापर्यंत १८२ जागांचा तिढा सुटलेला आहे. परंतु बाकी १०६ जागांवर एकमत झालेले नाही.
अजित पवार गटाचे ३८ उमेदवार जाहीर
अजित पवार गटानेही ३८ उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली आहे. यासोबतच कॉंग्रेसमधून आलेले इगतपुरीचे हिरामण खोसकर, अमरावतीच्या कॉंग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमधून आलेले राजकुमार बडोले यांना उमेदवारी दिली. मात्र, राष्ट्रवादीसोबतच अपक्ष आमदार संजयमामा शिंदे आणि मोर्शीचे आमदार देवेंद्र भोयार यांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही.