कळंब : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलिस प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई करत कळंब शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ५९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जुगारविरोधातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून ही कारवाई पोलिसांनी केली. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंब-ढोकी रोडवरील हॉटेल हिमालय बार शेजारी असलेल्या संदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे क्लब नोंदणीच्या परवान्याचा गैरवापर करून तीन पत्ती (तिरट) जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी अत्यंत गुप्तपणे सापळा रचत स्वतः कारवाईचे नेतृत्व केले. विशेष पथकाने अचानक छापा टाकून सुरू असलेला जुगार उधळून लावला. घटनास्थळावरून ५४ जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. तसेच क्लबच्या पाच संचालकांसह एकूण ५९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण १९ लाख ९६ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच आरसीपी व क्यूआरटी पथकातील अधिकारी,अंमलदार आणि चालक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
















