पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील वर्दळीच्या स्वारगेट परिसरात एका धावत्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपोलो हॉस्पिटलसमोर घडलेल्या या थरारक घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व १७ प्रवाशांचा जीव वाचला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस प्रवाशांना घेऊन स्वारगेटच्या दिशेने जात होती. बस अपोलो हॉस्पिटलजवळ आली असताना गाडीतून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच ज्वाला भडकू लागल्या. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच बस चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत गाडी तात्काळ रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी उभी केली.
चालकाने गाडी थांबवताच प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्वांच्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे बसमधील १७ प्रवाशांना वेळेत बाहेर काढता आले, ज्यामुळे एका मोठ्या दुर्घटनेतून या सर्वांचा जीव थोडक्यात बचावला.
शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
आगीच्या या घटनेमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते, ज्याचा परिणाम म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे ठोस कारण अद्याप समोर आले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज अधिका-यांकडून वर्तवला जात आहे.
















