लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बोगस मतदान आणि मतदार यादीतील कथित गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक सुधारणांच्या तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
मतदार यादी आधार कार्डशी जोडण्यापासून ते मतदान केंद्रांवर बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यापर्यंतच्या उपाययोजना त्यांनी सुचवल्या आहेत. मतदार यादीतील दुबार नावे आणि बोगस मतदारांची नोंद रोखण्यासाठी प्रत्येक मतदाराचे नाव आधार कार्डशी जोडण्यात यावे, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे. यामुळे एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा नोंदणी होण्याचे प्रकार रोखण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.
तसेच मतदान केंद्रांवर बायोमेट्रिक रीडिंग मशीन उपलब्ध करून द्याव्यात. केवळ ओळखपत्र दाखवण्याऐवजी मतदाराची बोटांचे ठसे किंवा अन्य बायोमेट्रिक पद्धतीने ओळख निश्चित करावी. त्याचबरोबर मतदार यादीची सखोल तपासणी करून एकाच व्यक्तीच्या नावाने वेगवेगळ्याठिकाणी झालेल्या नोंदी शोधून काढाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
















