मुंबई (प्रतिनिधी) : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत मात्र रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली.
पुण्यात जीबीएसच्या प्रादुर्भाव वाढला असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. या वेळी बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले.
जीबीएस हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न, मांस खाल्यामुळे होतो. यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. पुण्यात ३१ तारखेला क्रिकेट सामना आहे. त्या वेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी सूचना फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केली तर पुणे शहरांतील रुग्णांवर उपचारांसाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आल्याचे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले.
हा आजार दुर्मीळ आहे; पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. याबाबत पुण्यात आढावा घेतला आहे. उपचार आणि तपासणीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, दोन्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या वेळी स्पष्ट केले.
पुण्यात सध्या जीबीएसचे १११ रुग्ण आहेत तर ८० रुग्ण ५ कि. मी.च्या परिघातील आहेत. ३५ हजार घरे आणि ९४ हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप जीबीएसमुळेच झाला याची अजून पुष्टी नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.