सोलापूर : सायबर सेलशिवाय शहर पोलिसांनी आता स्वतंत्रपणे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल सुरू केला आहे. पोलिस आयुक्त स्वत: दररोज त्याचा आढावा घेतात. सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाने कोणतीही पोस्ट व्हायरल करताना त्याबद्दल खात्री करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो.असे सोलापूर शहर पोलिस उपायुक्त दीपाली काळे यांनी सांगीतले.
दोन धर्मात किंवा जातीत तेढ निर्माण होईल किंवा महापुरुषांबद्दल बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २०००मधील कलम ६६(सी) व भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत कलम ५०५ (२) यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल होतो. तसेच व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिन देखील आक्षेपार्ह पोस्टला जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध देखील भादंवि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी आता स्वतंत्र सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन केला आहे.
व्हाट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पोलिसांचाही वॉच आहे. लोकसभा निवडणूक व आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सोशल मिडियावर लक्ष आहे. काहीजण जाणीवपूर्वक सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात, अशांवर विशेष वॉच आहे. प्रत्येकाने पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी खात्री करावी, अन्यथा पोस्ट टाकणारा व चुकीच्या पोस्टला प्रतिसाद देणाऱ्याविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो. सामाजिक शांतता बिघडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दोन धर्मात, जातीत किंवा गटात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियातून व्हायरल करणे गुन्हा आहे. एखादा धर्म किंवा जाती विषयक, महापुरुषांबद्दल बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्यास भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो. दुसरीकडे भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार देखील गुन्हा दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यावर आरोपींना आर्थिक दंड लाखांवर असून तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदही आहे.
सामाजिक तेढ निर्माण होईल किंवा इतर कोणीतरी गुन्हा करण्यास प्रवृत्त होईल अशी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली व त्याला व्हाट्सॲप ग्रुपमधील इतर सदस्यांनी प्रतिसाद दिल्यास (दोनपेक्षा अधिक सदस्य असलेला ग्रुप) ॲडमिनविरुद्ध पण भादंवि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल होतो. तत्पूर्वी, ॲडमिनचा ग्रुप सुरू करण्यामागील हेतू पडताळला जातो. आपल्या व्हाट्सॲप ग्रूपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची माहिती पोलिसांना देणे, सेल्फ ॲडमिनचा पर्याय निवडणे, ग्रुपमधील आक्षेपार्ह पोस्ट डिलीट कराव्यात, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.