मुंबई : प्रतिनिधी
मालेगावात २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सर्व आरोपींना मुंबई हायकोर्टाने आज पुन्हा एकदा नोटीस जारी केली. त्यामुळे आता या आरोपींच्या पुन्हा अडचणी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कोर्टाने एनआयएलाही नोटीस जारी केली आहे.
एनआयएच्या विशेष कोर्टाने ३१ जुलैला साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय रहीरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी यांची निर्दोष सुटका केली होती. पण या बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडितांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ३१ जुलैला एनआयए कोर्टाने दिलेला निर्णय रद्द करण्याची आणि आरोपींना दोषी ठरवण्याची मागणी केली आहे.
मालेगावात २९ सप्टेंबर २०१८ रोजी रमजानच्या महिन्यात मुस्लिम बहुल परिसरात भीकू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणी एनआयएने तपास करत काही जणांना अटक केली होती. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सहा आरोपींच्या विरोधात कोर्टात अनेक वर्षांपासून सुनावणी पार पडत होती. अखेर यावर्षी ३१ जुलैला एनआयए कोर्टाने आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. पण या घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांनी एनआयए कोर्टाच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली.