नाशिक : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली.
यावर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये दोन उमेदवारांची घोषणा केली. यावरून आता महाविकास आघाडीतही बिघाडी होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या बैठकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांकडून एकमुखाने हा ठराव करण्यात आला.
नाशिक मध्यची जागा काँग्रेसला सुटावी
ठाकरे गटाच्या परस्पर उमेदवारांच्या नावाचा ठराव करण्याला काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. नाशिक मध्यची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे, असा काँग्रेस बैठकीत ठराव झाल्याची माहिती काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी दिली आहे.
शरद पवार गटाचा ठाकरे गटाला खोचक टोला
महाविकास आघाडीत अद्याप जागावाटप झालेले नसताना ठाकरे गटाकडून नाशिक मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाचा ठराव करण्यात आल्याने शरद पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. ठाकरे गटाकडून नाशिक मध्य आणि पश्चिमच्या उमेदवारांची नावे एकमताने ठरवण्यात आली, त्यांना शुभेच्छा, असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी म्हणून कोणकोणत्या जागा लढणार त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत. पक्ष आणि वरिष्ठ स्तरावर जेव्हा विचार होईल आणि जो निर्णय येईल तो मान्य असेल, असेही नितीन भोसले यांनी म्हटले आहे.