नवी दिल्ली : लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची चौथी बैठक मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दिल्लीत झाली. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आले आहे. टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे.
ममतांच्या प्रस्तावाला आम पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे. यासोबतच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या निमंत्रकपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचाही प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, खर्गे यांच्या नावावर अद्याप अंतिम एकमत झालेले नाही.
इंडिया आघाडीच्या बैठकीत खासदारांच्या निलंबनाचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. या मुद्द्यावर विरोधक एकजुटीने लढा देतील, असे सांगण्यात आले आहे. एकूण १४१ खासदारांच्या निलंबनानंतर लोकसभेत १०२ विरोधी खासदार आणि राज्यसभेत ९४ विरोधी खासदार उरले आहेत.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या बैठकीला सपा नेते अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि आरएलडीचे जयंत चौधरीही उपस्थित होते.