24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeसोलापूरबांधकाम मजुरांच्या साहित्य वाटपात एजंटांची खाबुगिरी

बांधकाम मजुरांच्या साहित्य वाटपात एजंटांची खाबुगिरी

सोलापूर : बांधकाम कामगार व मजुरांना गृहोपयोगी वस्तू संचाच्या वाटपात काळाबाजार होत आहे. मूळ कामगार बाजूला आणि बनावट व्यक्तीस उभे करून हे साहित्य लुटले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. तर दुसरीकडे या साहित्याच्या आमिषाने नागरिक दमाणी नगरमधील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात नवे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गर्दी करत आहेत. मुळेगावमध्ये साहित्य वाटप केंद्रावर जितकी गर्दी तितकीच याठिकाणी पहावयास मिळते आहे.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सक्रिय जीवित नोंदी असणाऱ्या कामगारांना शासनातर्फे गृहोपयोगी व बांधकाम साहित्याचे कीटक मोफत वाटप करण्यात येत आहे. परंतु यात एजंटांची खाबुगिरी होत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. तसे पाहता कामगार आयुक्त कार्यालयाकडून रीतसर अर्ज, कागदपत्रे तपासत या कामगारांना ते बांधकाम कामगाराचे स्मार्ट कार्ड मिळते. परंतु हे कार्ड करतानाच बांधकाम क्षेत्राशी काडीचाही संबंध नसलेल्या व्यक्तीच्या नावे कार्ड बनविले जात आहे.

हे कार्ड करण्यासाठी त्याच्याकडून २,७०० ते ३ हजार रुपये घेतले जातात. ३ हजारात कार्ड तयार झाले की, ८ हजारांची गृहोपयोगी भांडी व तितक्याच किमतीची सुरक्षा साहित्याची पेटी मोफत देण्यात येत आहे. हे बनावट कार्ड केलेल्यांना ३ हजारांत भांड्यांचा संच मिळत असून, बाकी साहित्याची पेटी बाजारात विक्री होत आहे. हे सर्व करण्यात एजंटांचा मोठा वाटा आहे. एव्हाना ही एक राज्यस्तरीय टोळीच असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.

बांधकाम कामगारांची कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या साहित्य वाटपात होणाऱ्या गोलमालबाबत आवाज उठविण्यात आला आहे. या वाटपाच्या कामासाठी वैभव रगबले व राजू बोरामणीकर यांची मफतलाल ग्रुपने नियुक्ती केली आहे. परंतु हे साहित्य वाटपाचे काम जसे व्हायला हवे, तसे होताना दिसत नाही. या दोघांद्वारेच एजंट नेमले गेले आहेत. मूळ कामगार यापासून वंचित राहत असून, चुकीच्या पद्धतीने वाटप होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात सहायक कामगार आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रारही या संघटनेने केली आहे.एकीकडे मुळेगावजवळील गोदामात हजारो लोक ताटकळत बसलेले आहेत. तर दुसरीकडे या साहित्याच्या आमिषापोटी लोक दमाणी नगरच्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयात गर्दी करत आहेत. याठिकाणीही हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी दलालांच्या टोळ्या सक्रिय आहेत. अशा दलालांनी जर पैशाची मागणी केली आणि तुमचे काम करून देतो, असे कुणी म्हणत असेल तर त्यांच्यावर नजीकच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवा असे सहायक कामगार आयुक्त एस. एम. गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR