पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये मामाने भाचाला तब्बल १ हजार ३७५ गुलाबांचा पुष्पगुच्छ दिला आहे. यामुळे या विवाहाची चर्चा सर्वत्र आहे. याआधी दीपक हरके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील १ हजार ३६९ गुलाब पुष्पांचा गुच्छ दिला होता. केवळ हौस म्हणून मामाने भाच्यासाठी हा गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला आहे. यामुळे या विवाहाची चर्चा सध्या रंगत आहे.
हौस ही मोठी गोष्ट असते, म्हणतात ना हौसेला मोल नसते. पिंपरी-चिंचवडमध्ये असेच काहीसे चित्र बघायला मिळाले. नीरज घोंगडे आणि प्रतीक्षा उडगे यांचा रविवारी दुपारी विवाह संपन्न झाला.
हा विवाह सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी आणि हौस म्हणून मामा दीपक हरके यांनी भाचा नीरज घोंगडे याला भला मोठा गुलाब पुष्पगुच्छ भेट दिला. हा कुठला छोटा-मोठा गुच्छ नव्हता तर तब्बल १ हजार ३७५ गुलाबांचा गुच्छ होता. तो दोघांनी उचलून नवरदेव नीरज आणि त्याची पत्नी प्रतीक्षाला दिला. हा गुच्छ बनवण्यासाठी दीपक हरके यांना एक दिवस लागला. याआधी देखील हरके यांनी अशाच प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भलामोठा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सरप्राईज दिले होते.