सांगोला : जमिनीच्या वादातून गोळीबार करून उज्ज्वला पांढरे हिस जीवे ठार मारल्याप्रकरणातील आरोपी बिरू पांढरे यास भादंवि ३०२,३०७,२०१ आदी कलमान्वये दोषी धरून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी आरोपीस जन्मठेपेच्या शिक्षेसह ५ हजार रुपये द्रव्य दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदनवाडी (ता. सांगोला) येथे आरोपीने गैर कायद्याची मंडळी जमवून तुम्ही जमीन खरेदी का केली, या जमिनीला कूळ आहे. या कारणावरून त्याने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण केली. यावेळी आरोपीने बंदुकीमधून गोळीबार करून उज्ज्वला पांढरे यांना ठार मारले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सांगोला पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी करून आरोपीविरुद्ध पंढरपूर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
यावेळी न्यायालयापुढे आलेल्या पुराव्याचे अवलोकन करून आरोपी बिरु पांढरे यास भादंवि ३०२ करिता दोषी धरून जन्मठेपेच्या शिक्षेसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या केसमध्ये सरकारी वकील म्हणून अॅड. सारंग वांगीकर यांनी कामकाज चालवले तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल राजू माने यांनी मदत केली.
गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. भुई सोलापूर, तसेच जखमेवर उपचार करणारे डॉ. धनंजय गावडे, तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर करचे, सहायक पोलिस निरीक्षक महादेव कुंभार, पोलिस हवालदार शिवाजी पांढरे, पोलिस नाईक सावजी, इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तर आरोपी पक्षातर्फे गुन्ह्यातील हत्यार बंदूक जप्त केली नाही. तोंडी पुरावा, वैद्यकीय पुरावा एकमेकांशी सुसंगत नाही, आरोपीने स्वतःची मिळकत वाचवण्याचा हक्क असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.