25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeसोलापूरपुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांची मांदियाळी

पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांची मांदियाळी

पंढरपूर : पौष शुक्ल एकादशी अर्थात पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीमुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान सहा ते सात तासांचा तर मुखदर्शनासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत होता. पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचे वाळवंट, प्रदक्षिणामार्ग, महाद्वार, पश्चिमद्वारसह विठुरायाची पदस्पर्श आणि मुख दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेली दिसत होती.

शहरातील पार्किंगच्या ठिकाणांवर देखील वाहनांची प्रचंड गर्दी झालेली होती. सकाळ पासूनच नगरप्रदक्षिणेसाठी दिंड्या तसेच वारकरी भाविकांची लगबग सुरु होती. शहरातील पश्चिमव्दार तसेच महाव्दारात प्रासादिक वस्तुंच्या खरेदीसाठी देखील वारक-यांची गर्दी झालेली दिसत होती. उजनी धरणातून सोलापूरसाठी भीमानदीतून पाणी सोडण्यात आल्यामुळे येथील चंद्रभागा नदी मध्ये देखील पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीच्या स्रानाचा आनंद भाविक मनमुराद घेताना दिसत होते. एकादशी असून देखील नेहमी प्रमाणे वाळवंटात अस्वच्छता दिसत होती. त्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

येथील नगरप्रदक्षिणा रस्त्यांवर विशेष: कालिकादेवी चौक, काळामारुती, चौफाळा तसेच नाथचौक आदी भागात भाविकांच्या गर्दीमुळे स्थानिक नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसत होते. या मध्ये शाळेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडणा-या रिक्षा तसेच टॅक्सीवाले या बरोबरच दुचाकीवरुन लहानग्यांना शाळेपर्यंत सोडणा-या पालकांचे विशेष: महिला पालकांचे हाल होत होते. पौष शुक्लपक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीचे महात्म्य सांगताना कृष्णाने धर्मराजाला सांगितले की, पूर्वी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापुण्यशील व पराक्रमी होता. त्याला शैब्या नावाची महान पतिव्रता अशी एक पत्नी होती.

या उभयतांना सर्वसुखे अनुकुल होती. मात्र त्यांना पुत्र संतान नव्हते. त्यामुळे राजी आणि त्याची धर्मपत्नी दोघेही दु:खी होते. ते भगवंतांची प्रार्थना करीत होते. यावेळी भगवान कृष्णाने त्यांना एक रमणीय सरोवर व काही ऋषीमुनी तिथे स्रान करीत असल्याचे दृष्टांत्न दिला. त्यावेळी त्यांना ऋषीमुनींनी (भगवान) अर्थात विश्वदेवांनी सांगितले की, जे कोणी पुत्राची इच्छा धरुन पुत्रदा एकादशीचे व्रत करतील त्यांना पुत्रप्राप्ती (संतानप्राप्ती) होईल. त्या प्रमाणे राजाने आणि त्याच्या पत्नीने पुत्रदा एकादशीचे व्रत केले. त्यानंतर त्यांना निश्चितच संतती प्राप्त झाली. सामान्य एकादशी प्रमाणेच पुत्रदा एकादशीचे देखील व्रतदेखील केले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR