नागपूर : ‘मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे,’ असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. वडेट्टीवार यांच्या विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे. पण, वडेट्टीवार वक्तव्यावर ठाम आहेत. असे असतानाच वडेट्टीवार यांनी आणखी एक दावा करत मंगेशकर रुग्णालयाला लक्ष्य केले आहे. समाजसेवक प्रकाश आमटे यांना उपचारासाठी दीनानाथ रुग्णालयात दाखल केल्यावर एक रुपयाही घेणार नाही, असे सांगितले होते. परंतु, नंतर त्यांच्याकडून पाच लाख घेतले, असा आरोप वडेट्टीवारांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर केला आहे.
ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते विजय वडेट्टीवार म्हणाले, प्रकाश आमटे हे थोर समाजसेवक होते. त्यांना कर्करोग झाल्यावर दीनानाथ रुग्णालयात दाखल केले. प्रकाश आमटेंकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही, असे सांगण्यात आले. नंतर उपचार सुरू झाले, मात्र बाहेरून औषधी मागवण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये मागितले गेले. महाराष्ट्र भूषण थोर समाजसेवकालाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सोडले नाही.
विदर्भ साहित्य संघाच्या उत्सवात लता मंगेशकर यांनी मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. साहित्य संघाने तयारी करून संपर्क साधला, तेव्हा तिथून निरोप आला. पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा. स्पेशल फ्लाईट करून द्या. त्यासाठी २२लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. चेकने देण्याची तयारी दर्शवल्यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘पैसे चेकने नाही, तर कॅशने द्या,’ असे म्हटले. विदर्भ साहित्य संघाने आम्ही संस्था असल्याने कॅशने पैसे देणे शक्य नाही, असे सांगितले आणि लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला.
त्यावर लता मंगेशकर यांनी ‘हृदयनाथ मंगेशकर जे सांगत आहेत तसेच करा,’ असे म्हटले. त्यामुळे अखेर कार्यक्रम रद्द करावा लागला असेही वडेट्टीवारांनी म्हटले. एका खासदाराने साहित्य संमेलनात येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिले. त्या संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले गेले, त्या खासदाराने ते पैसे दिले. कार्यक्रम जवळ आल्यावर आणखी तीन लाख रुपये मागितले गेले. पण, कार्यक्रमात येण्यासाठी पैशांच्या मागणीवर अडून राहिल्या, असेही वडेट्टीवारांनी सांगितले आहे.