पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत आतापर्यंत तरी नेमबाज आणि बॅडमिंटन खेळाडू चमकले आहेत. याआधी नितीश कुमार, सुहास यथीराज आणि सुकांत कदम यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
यथीराज आणि सुकांत हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, त्यामुळे भारताचे एक पदक निश्चित झाले आहे. आता यानंतर रविवारी मनीषा रामदास हिनेही महिलांच्या एकेरी एसयू५ प्रकारात उपांत्य फेरीत धकड मारली आहे. यामुळे भारताचे बॅडंिमटनमध्ये आणखी एक पदक निश्चित झाले आहे. कारण रविवारी रात्री आता मनिषाचा उपांत्य फेरीतील सामना भारताच्याच मुरुगेसन थुलासिमाथीविरुद्ध होणार आहे. तिनेही उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्यातील विजेत्या खेळाडूला सुवर्णपदकासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे, तर पराभूत होणारी खेळाडू कांस्य पदकासाठी खेळेल.
मनिषाने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मामिको तोयोडा हिला १३-२१, १६-२१ अशा फरकाने पराभूत केले. मनिषाने सुरुवातीपासूनच मामिकोवर वर्चस्व राखले होते. हेच वर्चस्व तिने संपूर्ण सामन्यात कायम ठेवले.
आता मनीषा आणि थुलासिमाथी यांच्यातील सामना रविवारी रात्री १०.३० नंतर होणार आहे. त्याचबरोबर यथीराज आणि सुकांत यांच्यातील उपांत्य सामन्याला संध्याकाळी ६.१५ नंतर सुरुवात होणार आहे. तसेच नितीश कुमारचा उपांत्य सामना जपानच्या दायसुके फुजिहारा विरुद्ध रात्री ८.१० नंतर सुरुवात होणार आहे. नितीश पुरुषांच्या एकेरी एसएल३ प्रकारात खेळत आहे. तसेच यथीराज आणि सुकांत हे एसएल४ प्रकारात खेळत आहेत.