जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती रात्री खालावली आहे. जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. मात्र त्यांचे उपोषण सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगेंना उपोषणस्थळी भोवळ आली होती. तसेच त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवला आहे. यामुळे त्यांची प्रकृती जास्त खालावली आहे. सलग सहाव्या दिवशी मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे. यामुळे मनोज जरांगेंच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे. मनोज जरांगेंना उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगेंना सलाईन लावण्यात आल्याने त्यांची तब्येत काहीशी स्थिर होती. मात्र आज पुन्हा त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो आहे.
याआधीही त्यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. परंतु महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या आश्वासनानंतर त्यांनी मध्यरात्री उपचार घेतले होते. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांना डॉक्टरांच्या पथकाने सलाईन दिली. जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे समजताच अनेक मराठा आंदोलक आणि जरांगे यांचे समर्थक अंतरवली सराटी गावात जमा झाले होते.