मुंबई : ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटातून अनेक मोठे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनय संपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनयाची झलक पाहावयास मिळाली आहे. फुलवंती या भव्य चित्रपटात देखील प्रेक्षकांना अनेक प्रतिभावंत कलाकारांचा अभिनय एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
नुकताच फुलवंती च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून, प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली फुलवंती कादंबरी चित्रपटरूपात ११ ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे. फुलवंती चित्रपटासाठी अनेक कलाकारांचे एकत्र येणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचे कौशल्य असणारे अभिनेते प्रसाद ओक यात ‘बाखरे सावकार नाईक’ या भूमिकेत दिसतील. तर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत विविध स्थरावर गाजलेले नाव म्हणजे वैभव मांगले यात ‘मार्तंड भैरवाचार्य’ या भूमिकेत दिसार आहेत. आपल्या अनोख्या अभिनयशैलीमुळे प्रसिद्ध असलेले अष्टपैलू अभिनेते ऋषिकेश जोशी ‘पंत चिटणीस’ यांची भूमिका करत आहे. आपल्या संवेदनशील अभिनयाने आणि दिग्दर्शनाने ठसा उमटवणारी अभिनेत्री स्नेहल तरडे यात ‘लक्ष्मी’ ची भूमिका साकारणार आहे.
यासोबतच मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील दर्जदार कलाकारांची फौज फुलवंती चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. तर दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली असून, नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. यासोबतच या चित्रपटाच्या संगीतवितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. हा भव्य चित्रपट ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.