चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या माया वाघिणीचा मागमूस काढण्याचा चंद्रपूर वन विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र मायाआधी आपल्या राज्यातील अनेक सेलिब्रिटी वाघ अचानक बेपत्ता झाले आहेत आणि वनविभागाला या वाघांचे नेमके काय झाले याचे स्पष्टीकरण देखील देता आलेले नाही. माया … क्वीन ऑफ ताडोबा … जगभरात लाखो चाहते असलेली सेलिब्रिटी वाघीण… माया वाघिणीचे लाखो फोटो-व्हीडीओ समाज माध्यमांवर लोकांनी आजपर्यंत शेअर केले आहेत.
तिच्यावर डॉक्युमेंट्री निघाली, डाक विभागाने स्टॅम्प देखील काढला . मात्र ही वाघीण ऑगस्ट महिन्यापासून अचानक बेपत्ता झाली आणि जगभरातील तिच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. कक्ष क्रमांक ८२ मध्ये अवशेष सापडले ते मायाचे असण्याची शक्यता आहे. मात्र डीएनए मॅच झाले नाही तर पुन्हा प्रश्न अनुत्तरित राहणार की मायाचे काय झाले? विशेष म्हणजे या आधी देखील आपल्या राज्यात अनेक सेलिब्रिटी वाघ बेपत्ता झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘वॉकर’ या वाघाने १४ महिन्यांत टिपेश्वर-अजिंठा-आदिलाबाद आणि ज्ञानगंगा अभयारण्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला. मार्च २०२० ला त्याला लावलेल्या कॉलरची बॅटरी संपली आणि हा वाघ बेपत्ता झाला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘जय’ अवघ्या पावणेदोन वर्षांचा असताना रानगव्याची शिकार करणारा मध्य भारतातील सर्वांत धिप्पाड वाघ अशी ओळख होती.
सचिन तेंडुलकरसारख्या सेलिब्रेटींनी हा वाघ पाहण्यासाठी उमरेड-करांडलाच्या अक्षरश: वा-या केल्या. मात्र एप्रिल २०१६ मध्ये जय अचानक बेपत्ता झाला. नागपूर जिल्ह्यातीलच कळमेश्वर-कोंढाळी परिसरातील ‘नवाब’ वाघ अचानक बेपत्ता झाला. नावाप्रमाणेच अतिशय देखणा आणि रुबाबदार या वाघाने अमरावती जिल्ह्यात स्थलांतर केले आणि २०१८ मध्ये अचानक बेपत्ता झाला. धक्कादायक म्हणजे वनविभागाला या बेपत्ता झालेल्या वाघांचे नेमके काय झाले याचे स्पष्टीकरण आजपर्यंत देता आलेले नाही.
वाघांची शिकार
पर्यटकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे किमान बेपत्ता होणा-या या सेलिब्रिटी वाघांवर सामाजिक संस्था, वन्यजीव प्रेमी आणि मीडियाचे लक्ष तरी जाते. अन्यथा अनेक वाघ शिकार होतात. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात या वर्षी बावरिया टोळीच्या शिकारीत चार वाघ मारले गेले. आसाम राज्यात शिकार झालेल्या वाघाची कातडी सापडेपर्यंत आपल्या राज्यातील वनविभागाला याचा पत्ता देखील नव्हता.