नागपूर : मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो आहे.
पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणा-या नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेता नागपूर शहरातील अनेक उड्डाणपूल आज सोमवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. उड्डाणपुलावरून वाहन चालवताना पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी १५ जानेवारीला दिवसभरासाठी शहरातील जवळ-जवळ सर्व उड्डाणपूल बंद करण्यात आले आहेत.
प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणा-यांविरोधात राज्यभरात पोलिसांकडून जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. बंदी असून देखील त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. दरवर्षी या पतंगबाजीच्या नादात अनेक हृदयद्रावक घटना घडत असतात. त्यातील सर्वाधिक घटनांमागे कारण हा नायलॉन मांजा ठरत आहे. या नायलॉन मांजाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. यासोबतच प्रशासनाला यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत.