मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि आता बाबा सिद्दीकी यांनी गुरूवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या ४८ वर्ष सोबत असलेला काँग्रेसचा हात बाबा सिद्दिकी यांनी सोडला आहे. सिद्दिकी येत्या १० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बोलताना याला दुजोरा दिला आहे.
शुक्रवारी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, बाबा सिद्दीकी हे १० फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबतच आणखी काही नेते ११ फेब्रुवारीला पक्षात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिले आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे आणखी कोणते नेते त्यांच्या पक्षात जाणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा माझा ४८ वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला खूप काही बोलायचे आहे. पण, ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या ब-या…या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असे बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.